डोंबिवली धामटण गावात बेकायदा चाळींमधील घर खरेदीत ६५ नागरिकांची ९४ लाखांची फसवणूक
दिपक भाऊ खंदारे

डोंबिवली – डोंबिवली जवळील धामटण गाव हद्दीत एकविरा ढाब्याच्या मागील बाजुस भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारल्या. या चाळींमधील प्रशस्त आकाराची घरे सात लाख रूपयांना विक्री करत असल्याच्या जाहिराती समाज माध्यमांत प्रसारित केल्या. या जाहिरातींना भुलून डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरातील ६४ नागरिकांनी घर खरेदीसाठी भूमाफियांकडे पैसे भरणा केले. त्यानंतर बेकायदा चाळीतील घर नाहीच, पण घरासाठी भरणा केलेले पैसेही परत मिळाले नाहीत म्हणून ६५ घर खरेदीदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे.
.
घर खरेदीत फसवणूक झालेल्या जुनी डोंबिवलीतील आचल गुप्ता यांच्या पुढाकाराने ६५ नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात खोणी येथील साई माऊली बिल्डर आणि डेव्हलपर्सचे भूमाफिया सचिन संभाजी सुर्वे, कदम, वाघमारे, निखील कडलग, रवींद्र यादव यांच्या विरूध्द बुधवारी तक्रार केली. मानपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
तक्रारदार आचल गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आम्हा कुटुंबीयांना घर खरेदी करायचे होते. व्हॉट्सवर आपणास जान्हवी प्रॉपर्टी नावाने जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत सात लाख रूपयांमध्ये २ बीएचके सदनिका, पाच लाख रूपयांमध्ये १ बीएचके सदनिका धामटण गाव हद्दीत एकविरा ढाब्याच्या मागे साई माऊली चाळीत तयार असल्याचे म्हटले होते.
दोन महिन्यापूर्वी आपण धामटणगाव येथे ते बांधकाम पाहिले. तेथे तीन खोल्या बांधल्या होत्या. २ बीएचके ६२१ चौरस फुट लांबीच्या या खोल्या ७ लाख ५० हजार रूपयांना आपण विक्री करणार आहोत, असे भूमाफिया कदम यांनी सांगितले. सदर सदनिका पसंत पडल्याने भूमाफियांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांच्या बँक खात्यावर २ लाख ५० हजार रूपये भरणा केले. उर्वरित रक्कम भरणा करण्यासाठी ते मल तगादा लावत होते. त्या रकमेचे आपण बँक कर्ज घेणार आहोत मग ती घर खरेदी करून असे आपण माफियांना सांगत होतो.
बनावट कागदपत्रे
भूमाफिया सचिन सुर्वे यांनी आपणास सदनिका खरेदीचे कायम खरेदीखत करून दिले. २ बीएचके सदनिका आपण खरेदी केली होती. या दस्तऐवजाला सात बारा उतारा होता. त्यात बिल्डरचे आधारकार्ड नव्हते. ते अपडेट करण्यासाठी दिले आहे, असे रवींद्र यादव यांनी खोटे सांगितले.
भूमाफिया आपणास उरलेले पाच लाख तात्काळ भरण्यासाठी तगादा लावत होते. आपण ती रक्कम कर्जाने भरणार आहोत असे सांगत होतो. गेल्या आठवड्यात आपणास भूमाफियांनी खोणी येथे घराची चावी घेण्यासाठी बोलविले. मी तेथे दुसऱ्या दिवशी गेले तर तेथे भूमाफियांचे कार्यालय बंद होते. तेथे भूमाफियांपैकी कोणीही नव्हते. कार्यालयाच्या बाहेर ६४ लोक गर्दी करून होती. त्यावेळी आपणास समजले की या भूमाफियांनी आपणास चावी देतो सांगून पळ काढला आहे. त्यांनी आपल्याकडून पैसे उकळून पळ काढला आहे.
आपल्याप्रमाणे इतर ६४ नागरिकांकडून घर खरेदीसाठी ५० हजार ते ४ लाख रूपयांपर्यंत रकमा माफियांनी उकळल्या आहेत. ६५ लोकांकडून एकूण ९३ लाख ८० हजार रूपये उकळून माफिया पळून गेले होते.
या फसवणूक झालेल्या लोकांमधील काही नागरिकांनी डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांना संपर्क केला.
फसवणूक झालेल्या रहिवाशांचा एक व्हॉट्सपग्रुप तयार करण्यात आला. या नागरिकांना संघटित करून प्रत्येकाने किती पैसे भूमाफियांना भरणा केले आहेत याची माहिती जमा करून ती एकत्रितपणे मानपाडा पोलीस ठाण्यात राणे यांच्या पुढाकाराने देण्यात आली.
सामान्यांची फसवणूक माफियांनी केल्याने त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मनीषा राणे यांच्या पुढाकाराने भूमाफियांनी फौजदारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस या घर खरेदीत आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास करत आहेत.




