Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to BASPA PARIVAR THANE MAHARASHTRA
Uncategorized
Trending

डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन, दावडीतील ९० टपऱ्या, हातगाड्यांचा चुराडा; २०० निवारे भुईसापट… पालिका आय प्रभागाची कारवाई…

दिपक भाऊ खंदारे

डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पूर्वेतील आय प्रभागाने बुधवारी टाटा नाका, दावडी, कल्याण शिळफाटा रस्त्यावरील बेकायदा ९० टपऱ्या, हातगाड्यांचा जेसीबीच्या साहाय्याने जागीच चुराडा केला. तसेच, व्यापाऱ्यांनी दुकानासमोर उभे केलेले निवारे, पदपथ अडवून उभारलेले मंच अशी २०० बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

      पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका हद्दीतील सर्व रस्ते, पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे असले पाहिजेत असे आदेश सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, अधीक्षक राजेंद्र साळुंखे, फेरीवाला हटाव पथकप्रमुख जनार्दन पवार, अमित गायकर १५ हून अधिक कामगार, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत ही तोडकामाची कारवाई करण्यात आली.

     टाटा लाईनपासून या कारवाईला बुधवारी सकाळी सुरूवात करण्यात आली. एकावेळी फेरीवाला हटाव पथकाचे कामगार, दोन जेसीबी टाटा लाईन भागात आले. त्यांनी मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर, पदपथ अडवून लावलेल्या हातगाड्या, टपऱ्या जेसीबीने जागीच तोडण्यास सुरूवात केली. काही फेरीवाल्यांनी आपल्या टपऱ्या, हातगाड्या वाचविण्यासाठी धडपड केली. पोलीस आणि पालिका पथकांनी त्यांना दूर केले. अवजड टपऱ्या जेसीबीने फोडून तो कचरा पालिकेच्या भंगार तळावर नेण्यात आला

     अचानक फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू झाल्याने टाटा लाईन परिसरात फेरीवाल्यांची पळापळ झाली. दुकानांसमोरील निवारे, अडथळे या कारवाईच्यावेळी दूर करण्यात येत होते. कारवाई पथक फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करत दावडी गावापर्यंत पोहचले. दोन जेसीबी आणि १५ हून अधिक कामगार एकावेळी फेरीवाल्यांचे सामान जप्त करणे, हातगाड्या, टपऱ्या तोडणे आणि जप्त करण्याचे काम पथक करत होते.

     हातगाड्या वाचविण्यासाठी पुढे येणाऱ्या फेरीवाल्यांना बंदोबस्तावरील पोलिसांकडून अटकाव करण्यात येत होता. कारवाई पथक आले आहे हे समजताच काही फेरीवाले आपले सामान घेऊन पळत होते. फेरीवाला पथक त्यांना अडवून त्यांचे सामान जप्त करत होते. ही कारवाई आक्रमकपणे सुरू असताना काही राजकीय मंडळींना संपर्क करून काही फेरीवाले आपल्या टपरी, हातगाडीवर कारवाई होणार नाही यासाठी प्रयत्न करत होते.

      पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू केली होती. त्यामुळे एकाही फेरीवाल्याला अभय देण्याचा प्रयत्न या कारवाईच्यावेळी अधिकाऱ्यांनी केला नाही. याऊलट असे दबावतंत्र वापरले तर फौजदारी कारवाई करण्याची तंबी साहाय्यक आयुक्त जगताप फेरीवाल्यांना देत होते.

    निवारे तोडले

आय प्रभाग हद्दीतील अनेक दुकानदारांनी दुकानासमोर निवारे उभारले होते. तेही कारवाई पथकाने जमीनदोस्त केले. पुन्हा असे निवारे उभारले तर फौजदारी कारवाई करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दुकानदारांना दिली.

    आय प्रभाग हद्दीत नियमित फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे रस्ते, पदपथ नागरिकांसाठी मोकळे असेल पाहिजेत म्हणून ही विशेष फेरीवाल्यांविरूध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत २०० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. ९० हूनअधिक टपऱ्या, हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्यात आल्या. – चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!