संपूर्ण जगात भयानक इंधन टंचाई असताना भारताला जॅकपॉट लागला! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा
प्रतिनिधी

♦समुद्र मंथन मोहिमेअंतर्गत भारताला जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे.
संपूर्ण जगात भयानक इंधन टंचाई असताना भारताला जॅकपॉट लागला! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा
Oil India Discovers Natural Gas Reserves Andaman Sea : संपूर्ण जगात भयानक इंधन टंचाई असताना भारताला जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. इराण आणि अमेरिका इस्त्रायल युद्धामुळे जगात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. भारतालाही याचा फटका बसत आहे. कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे चिंता वाढली आहे. भारत तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के आणि गॅसच्या गरजेपैकी जवळपास 70 टक्के आयात करतो. आयातीमध्ये कोणताही व्यत्यय आल्यास भारतासमोर मोठ्या अडचणी निर्माण होतात. मात्र, आता भारताला मोठा वायू साठा सापडल्यामुळे भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भतेच्या दिशेने वाटलाच करु शकतो.
अंदमान आणि निकोबार प्रदेशात नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) या कंपनीने अंदमानच्या ऑफशोअर बेसिनमध्ये नैसर्गिक वायूचा मोठा साठा शोधला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आनंद व्यक्त केला.
आम्हाला अंदमान आणि निकोबार बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपुरम- 3 येथे नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. ही विहीर पाण्यात सुमारे १९०० मीटर खोलीवर आहे. प्राथमिक चाचणीदरम्यान, वायू सतत जळत असल्याचे दिसून आल्याने वायूच्या अस्तित्वाची पुष्टी झाली. वायूचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
अंदमान आणि निकोबार खोरे अनेक वर्षांपसून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले होते. सरकारच्या नवीन ‘ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी’ (OALP) ने सुमारे 10 लाख चौरस किलोमीटरच्या या प्रतिबंधित क्षेत्र खुले झाले आहे. अंदमान खोरे हे भारताच्या सर्वात आशादायक परंतु अद्यापही कमी शोध लागलेल्या सागरी प्रदेशांपैकी एक मानले जाते. शास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, येथे अंदाजे 37.1 कोटी टन तेल समतुल्य (mmtoe) संसाधने असू शकतात.
2026 पासून, भारतातील दोन सर्वात मोठ्या सरकारी कंपन्या, ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) आणि ओएनजीसी, अंदमान आणि निकोबार खोऱ्यात खोदकाम करत आहेत. हा प्रदेश सध्या “फ्रंटियर” आणि “प्री-कमर्शियल” टप्प्यात आहे. याचा अर्थ असा की, हायड्रोकार्बन्स सापडले आहेत, परंतु पूर्ण शोधकार्य झालेले नाही आणि व्यावसायिक उत्पादन अजून खूप दूर आहे.
ऑइलने विजयपुरम-1, 2 आणि 3 अशा तीन विहिरी खोदल्या आहेत. विजयपुरम-2 मध्ये 2,212–2,250 मीटर खोलीवर वायू (87 टक्के मिथेन) आणि त्याचा प्रवाह असल्याची पुष्टी झाली, तर विजयपुरम-1 कोरडी राहिली.
ओएनजीसीने AND-P1 नावाच्या अति-खोल समुद्रातील विहिरीचे काम सुरू केले आहे. समुद्रसपाटीपासून 6,000 मीटर खोलीपर्यंत खोदकाम करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. सध्या 4,000 मीटर खोदकाम झाले आहे. ANDW-7 आणि ANDW-9 सारख्या विहिरींमध्ये वायू सापडल्याची चिन्हे दिसली आहेत, परंतु अद्याप कोणतेही व्यावसायिक यश मिळालेले नाही. विश्लेषकांच्या मते, दोन्ही कंपन्यांची सध्याची कामे प्रामुख्याने भूवैज्ञानिक क्षमता समजून घेण्यासाठी अन्वेषण आणि चाचणी खोदकामावर केंद्रित आहेत.
अंदमानमध्ये खोदकाम करणे अवघड काम
अंदमान समुद्रात वायू शोधणे आणि तो व्यावसायिक बाजारात आणणे हे जगातील सर्वात कठीण अभियांत्रिकी कामांपैकी एक आहे. हा प्रदेश एक अति-खोल पाण्याचा प्रदेश आहे. जिथे पाण्याची खोली आणि समुद्रतळाखालील दाब यंत्रसामग्रीच्या क्षमतेची कठोर परीक्षा घेतात. अंदमानसारख्या गुंतागुंतीच्या प्रदेशात, शोधापासून उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेला सहा ते दहा वर्षे लागू शकतात. केवळ विहिरी खोदणे पुरेसे नाही. समुद्राखालील पाइपलाइनचे एक मोठे जाळे टाकणे, वायूचे द्रवीकरण करण्यासाठी द्रवीकरण प्रकल्प उभारणे. यानंतर तो मुख्य भूभागावर सुरक्षितपणे पोहोचवणे, हे एक मोठे पायाभूत आव्हान आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार, केवळ मुख्य भूभागावर वायूच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठीच पाच वर्षे लागू शकतात.






