दिवा-खर्डी मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव; नागरिकांचा संताप वाढला
सौरव आढांगळे

दिवा-खर्डी मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव; नागरिकांचा संताप वाढला

दिवा-खर्डी मुख्य रस्त्यावर अद्यापही पुरेशा प्रमाणात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात जात असल्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक वेळा अपघात व अनुचित घटनांचा धोका निर्माण होत असूनही संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दिवा-खर्डी हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. दररोज हजारो नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात. मात्र पथदिव्यांच्या अभावामुळे रात्री प्रवास करणे धोकादायक बनले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी व मागण्या करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाला खडेबोल सुनावत, “नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. तात्काळ पथदिवे बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा दिला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सौरव अढांगळे यांनी प्रशासनाकडे तातडीने पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.







