**ठाणे बाळकुम अमेझॉन डेटा सेंटरला विरोध तीव्र
- दिपक भाऊ खंदारे

**ठाणे, २९ सप्टेंबर**
ठाणे शहरातील बाळकुम परिसरातील प्रस्तावित अमेझॉन हायपरस्केल एआय डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध सुरू आहे. ‘वेक अप ठाणेकर’ या नागरिक गटाने प्रकल्प एमआयडीसीच्या रेड झोनमध्ये हलविण्याची मागणी केली आहे.
सुमारे ५३ ते ५४ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे पाणीटंचाई, ध्वनीप्रदूषण, उष्णता वाढ आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, या डेटा सेंटरसाठी रोज १२ ते १३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार असून, २४ तास ९० ते ९५ डेसिबल आवाज निर्माण होईल. आसपास मोठ्या संख्येने निवासी संकुलं, शाळा आणि रुग्णालये असल्याने नागरिकांचे जीवनमान धोक्यात येईल, असा दावा आंदोलकांनी केला आहे. प्रकल्पामुळे स्थानिकांना केवळ ६० ते १५० नोकऱ्या मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे. “जगाने नाकारलेला हा एआय डेटा सेंटर ठाण्याच्या मध्यभागी कसा उभारला जाऊ शकतो? पाणी, वीज आणि उष्णतेमुळे ठाणेकरांचे आयुष्य बरबाद होईल. हा प्रकल्प एमआयडीसी रेड झोनमध्ये हलवा, किंवा उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या दरे गावात उभारावा.” त्यांनी पुढे म्हटले की, आमचे सरकार आल्यावर हा प्रकल्प हद्दपार करू.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार नरेश म्हस्के यांनीही प्रकल्पाला स्थगिती देण्याची व वृक्षतोडीची चौकशी करण्याची मागणी केली होती. ‘वेक अप ठाणेकर’ संघटनेने अनेक वेळा निदर्शने, मानव साखळ्या आणि अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आहेत.
याउलट अमेझॉनने आपल्या अधिकृत विधानांत सांगितले आहे की, त्यांच्या ठाणे डेटा सेंटरमध्ये कूलिंगसाठी पाणी वापरले जाणार नाही. भारतातील इतर डेटा सेंटर्समध्येही closed-loop तंत्रज्ञान वापरले जाते. पाणी केवळ कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांसाठी आणि treated sewage landscaping साठी वापरले जाईल. वीज स्थानिक वितरण ग्रिडमधून न घेता स्वतःच्या dedicated high-voltage substation मधून घेतली जाईल. आवाज नियंत्रण आणि पर्यावरणीय नियमांचे पालन केले जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
प्रकल्प अद्याप स्थगित झालेला नाही. मात्र नागरिकांचा आणि राजकीय पक्षांचा विरोध वाढत असल्याने राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेकडे दबाव वाढला आहे. आंदोलक प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी कायम ठेवत आहेत.
(वृत्तसंस्था)




