दिवा शहरातील नालेसफाई रखडल्याने नागरिकांमध्ये संताप; बसपाकडे तक्रारींचा ओघ
दिवा प्रतिनिधी

दिवा, दि. 21 जून : दिवा परिसरातील डीजे कॉम्प्लेक्स, साबे गाव येथील जीवदानी नगर परिसरात होली एंजल इंग्लिश स्कूलसमोरील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी सफाई अद्याप पूर्ण झालेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बहुजन समाज पार्टीचे दिपक भाऊ खंदारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक आमदार राजेश मोरे, नगरसेवक बाबाजी पाटील तसेच नगरसेविका वेदिका पाटील आणि अर्चना पाटील यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी बसपा पक्ष कार्यालयात प्राप्त होत आहेत.
दिवा शहरातील नालेसफाई आणि तलाव सफाईच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त तसेच दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या समस्या त्वरित न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. पावसाळ्यात नाले तुंबल्यास पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
— प्रतिनिधी







